बंगळुरु - झपाट्याने वाढत असलेल्या सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात हिरवीगार जंगले नष्ट होत आहेत. शहरांमध्ये तर झाडांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. मात्र, कर्नाटकमधील एका साठ वर्षीय व्यक्तिने शिवमोग्गा शहराला स्वच्छ हवा देण्याची जबाबदारी उचलली आहे. नव्याश्री नागेश असे या 'हरितदूता'चे नाव आहे.
नागेश यांनी शिवमोग्गा-शिकारीपुरा महामार्गावर एक एकर जमिन खरेदी करून त्यावर वृक्षांची लागवड केली आहे. त्यांनी या वनाला 'ईश्वरवन' असे नाव दिले आहे. या ईश्वरवनामध्ये झाडांच्या तीस वेगवेगळ्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. यात काही फळझाडांचाही समावेश आहे. हिरवाईने नटलेल्या या वनाला अनेक पक्ष्यांनीही आपले घर बनवले आहे.
हेही वाचा - वर्तिका सिंह यांनी गृहमंत्र्यांना लिहलं रक्ताने पत्र , केली 'ही' मागणी
माणसाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचा नाश केला आहे. जंगल, पशु-पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. माझ्यावतीने एक लहानसा प्रयत्न म्हणून मी शंकराच्या नावाने ईश्वरवनाची उभारणी केली. देवाच्या नावाने वनांची राखन करणे, ही भारतीय संस्कृतीतील प्राचीन पद्धत आहे. मी आणखी जमीन खरेदी करून त्यावरही झाडे लावणार आहे, अशी प्रतिक्रिया नव्याश्री नागेश यांनी दिली.