मंगळुरू- मन्नागुड्डा येथून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे. येथील एक मुलगा मंदिरात जात होता. त्या दरम्यान एका अजगराने या मुलाच्या पायाला जखडले. यावेळी विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखून अजगराच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.
संकल्प जी पाई, असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अर्वा येथील कॅनरा शाळेत ५ व्या वर्गात शिकतो. बुधवारी (७ सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास संकल्प हा मंदिरात जात होता. तेव्हा अचानाक नालीतून एक अजगर बाहेर आला व त्याने संकल्पच्या उजव्या पायाला वेटोळे घातले. यावेळी संकल्पने स्वत:ला सावरत अजगाराच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या डाव्या पायाने अजगराला लाथा घालण्यास सुरुवात केली, आणि अजगराला पायातून वेगळे करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर अजगराने संकल्पचा पाय सोडला व एका पाईपमध्ये जाऊन लपून बसला.
या सर्व प्रकारानंतर संकल्पने परिसरातील नागरिकांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर नागरिकांनी सर्पमित्रासह घटनास्थळ गाठले व अजगराला सुखरूप पाईपमधून बाहेर काढले. अजगराला नंतर पिलीकुला बायोलॉजिकल पार्कमध्ये सोडण्यात आले. दरम्यान, या थरारक घटनेनंतर, माझ्या मुलाला झालेली जखम ठीक होत असल्याची माहिती संकल्पचे वडील गोपालकृष्णा पाई यांनी दिली आहे. तर, संकल्पच्या साहसाची सवत्र चर्चा आहे.
हेही वाचा- टीआरपी फेरफार प्रकरणाची संसदीय समितीकडून चौकशी होणार - सूत्र