नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनादिवशी वितरीत करण्यात येणाऱ्या, मानाच्या शौर्य पदकांसाठी यावर्षी देशभरातून ९२६ पोलीस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.
यामध्ये दिल्लीचे हुतात्मा पोलीस मोहन चंद शर्मा यांचाही समावेश आहे. त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. २००८मध्ये झालेल्या बाटला हाऊस चकमकीमध्ये शर्मा यांना वीरमरण प्राप्त झाले होते. २६ जानेवारी २००९ला त्यांना सर्वोच्च लष्करी पदक 'अशोक चक्र'ही (मरणोत्तर) देण्यात आले होते.
गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांमधील हुतात्मा कॉन्स्टेबल एकनाथ यादव आणि अतिरिक्त अधीक्षक राजेश साहनी या दोघांनाही मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. यांच्यासोबतच, सीआरपीएफचे हुतात्मा कॉन्स्टेबल प्रांजल पाचानी, लाजू एन.एस., फतेहसिंग कुडोपा आणि लक्ष्मण पूर्ती; तर सीमा सुरक्षा दलाचे असिस्टंट कमांडर हुतात्मा विनय प्रसाद या सर्वांचीही मरणोत्तर शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
देशभरातील विविध सुरक्षा दलांमधील आणि राज्य पोलीस तसेच पॅरामिलिट्री दलातील २१५ अधिकाऱ्यांची निवड राष्ट्रपती शौर्य पदकासाठी करण्यात आली आहे. तर, ८० अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी पदक देण्यात येणार आहे. यासोबतच, ६३१ पोलीस अधिकाऱ्यांना गुणवंत सेवेसाठी पदक देण्यात येणार आहे.
शौर्य पदकासाठी निवड झालेल्या २१५ पोलिसांमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांतील ८१, सीआरपीएफमधील ५५, उत्तर प्रदेश पोलिसांमधील २३, दिल्ली पोलिसांतील १६, महाराष्ट्र पोलिसांतील १४, झारखंड पोलिसांतील १२, आसाम पोलिसांमधील पाच, अरुणाचल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी तीन, तेलंगाणामधील दोन आणि एका बीएसएफ जवानाचा समावेश आहे.