लखनौ - उत्तर प्रदेशमधील मथुरा शहरापासून ३० किमी अंतरावर यमुना महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याने रविवारी रात्री साडेआठ वाजता हा अपघात घडला. या अपघातात कुटुंबातील ८ जण ठार झाले आहेत.
ग्रेडर नोएडा येथून अपघातग्रस्त कुटुंब ताजमहाल पाहण्यासाठी कारमधून जात होते. हे कुटुंब गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील जेवार येथील रहिवासी होते. अपघात झाल्यानंतर कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे मथुराचे ग्रामीण पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आदित्या कुमार शुक्ला यांनी सांगितले.
या भीषण अपघातात कारचा एवढा चुराडा झाला होता की, गॅस कटरच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढावे लागले.
अशी आहेत मृतांची नावे
नीरज (30), अनिता (30), विष्णू 23), तरुणा (21), संतोषी (19), शालू (20), अंजली (11) आणि गब्बर (24) अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली आहेत.
ग्रेटर नोएडा ते आग्राला जोडणाऱ्या यमुना महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने प्रवाशांसाठी हा चिंतेचा विषय झाला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकाबद्दल सहवेदना प्रगट केल्या आहेत.