रायपूर - छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील नवापार गावातील 'भगीरथ प्रसाद बिसोई' हे ७५ वर्षीय गृहस्थ आहेत. शेतीची आवड असणारे 'भगिरथ बिसोई' यांनी १९९६ साली स्वतःच्या घराच्या छतावर शेतीला सुरुवात केली. शेतीसाठी 'अपारंपरिक पद्धतीचा' वापर करत आजपर्यंत त्यांनी मिरची, टोमॅटो, कोबी, भेंडी, वांगी यांसारख्या भाज्या तसेच गहू, मका यांसारखी पिके घेतली आहेत.
भगिरथ बिसोई यांचा २१ वर्षांपासूनचा हा प्रवास थक्क करणारा आहे. छतावर फुलणारी शेती पाहून भगीरथ खूश होतात. दिवसभराच्या कामकाजानंतर छतावरील शेतीत काम करणे, पिकांची काळजी घेणे हा भगिरथ यांचा दिनक्रम आहे. पिकांच्या लागवडीसाठी नवनवे प्रयाग करायला त्यांना आवडते. त्यांच्या या शेतीला पाहण्यासाठी व प्रयोगांना जाणून घेण्यासाठी दूरवरून लोक त्यांच्याकडे येत असतात.
आज सगळीकडे रासायनीक शेती व त्यातील उत्पादनांचे दुष्परीणाम समोर येत असताना, भगिरथ बिसोई यांचा हा प्रयोग नक्कीच आदर्शवत आहे. संशोधनांती आज हे सिद्ध झाले आहे की, 'छतावरील शेती' ही तितक्याच प्रमाणात जमिनीवर केलेल्या शेतीपेक्षा नक्कीच किफायतशीर असते. प्राण्यांपासून संरक्षण आणी आपत्ती पासून बचाव करणे हे 'छतावरील शेतीत' सहज शक्य होते.
महासमुंदचे कृषी अधिकारी 'व्ही. पी. चौबे' यांनी, "शेतीतील हा प्रयोग नक्कीच वाखण्याजोगा आहे. शासनानेदेखील त्यांच्या या परिश्रमाची दखल घेत त्यांना सन्मानित केले आहे." असे ईटिव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.