इटानगर- अरुणाचल प्रदेशमध्ये आसाम रायफल्स आणि एनएससीएन संघटनेच्या नागा बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत सहा बंडखोर ठार झाले आहेत. तर आसाम रायफल्सचा एक जवान जखमी झाला आहे. राज्यातील खोनसा भागातील लोंडिंग जिल्ह्यातील निगीनू गावात ही चकमक झाली.
आसाम रायफल्स आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज(शनिवार) सकाळी ही कारवाई केली. शनिवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान पोलीस कारवाईसाठी निगीनू गावात पोहोचले होते. सुरक्षा दलांबरोबर चकमकीत सहा बंडखोर ठार झाले. त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. चकमकीनंतर जखमी जवानाला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड’ या माओवादी संघटनेचे सर्वजण सदस्य होते.
हाती आलेल्या माहितीनुसार , सुरक्षा दलांनी चार एके-47 आणि चिनी बनावटीच्या दोन एमक्यू बंदुका, मॅग्झिन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.