लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये दोन बसची समोरासमोर धडक होवून लखनऊ-हरदोई महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हून अधिक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत. दोन्ही बस या उत्तर प्रदेश सरकारची मालकी असलेल्या रोडवेजच्या आहेत. या अपघाताची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश रोडवेजने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती २४ तासात अहवाल सादर करणार आहे.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन्ही बस सकाळी समोरासमोर धडकल्या आहेत. दोन्ही बस वेगवान चालविल्या जात होत्या. त्यामुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना स्थानिक आरोग्य सुविधा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघातस्थळी उत्तर प्रदेश रोडवेजचे अधिकारीही पोहोचले आहेत.