नवी दिल्ली - लोकसभेसाठी ५ व्या टप्प्यातील मतदान आज सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान सुरू आहे. यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १४ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
Live Updates :
02:00 PM - क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने रांचीमध्ये पत्नी आणि आई-वडिलांसह मतदान केले.
01:00 PM - अभिनेते आशुतोष राणा यांनी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे मतदान केले.
12:00 PM - वडिलांचे अंत्यसंस्कार करून मुलगा मतदानाला पोहोचला. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भावनांनाही संयमात ठेवल्याचे उदाहरण या मतदाराने उभे केले.
11:00 AM - बिहारमधील छप्रा आणि सारण येथे ईव्हीएम मशीनची तोडफोड. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एकाला अटक
10:00 AM - बिहारमधील वैशाली येथील हाजीपूर येथे ईव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदानास उशीर.
9:30 AM - झारखंडमध्ये एका व्यक्तीने १०५ वर्षांच्या आईला खांद्यावर उचलून मतदानासाठी आणले.
9:00 AM - बिहारमधील वैशाली येथील हाजीपूर येथे ईव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदानास उशीर
8:30 AM - बसप अध्यक्ष मायावती यांनी उत्तर प्रदेशात लखनौ येथे मतदानाचा हक्क बजावला.
8:10 AM - जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या छायेत असलेल्या पुलवामामध्ये अनंतनाग मतदार संघासाठी मतदान सुरू. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी स्फोटात 40 जवानांना प्राण गमवावे लागले होते.
7:50 AM - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला.
7:40 AM - मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील गरौलीतील ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार. पाण्यासाठी महिलांना दररोज ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याची ग्रामस्थांनी मांडली व्यथा. मागील वर्षीही या कारणासाठी आंदोलन केले. मात्र, कोणत्याही राजकीय नेत्याने साधे ढुंकूनही पाहिले नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मार्गाचा अवलंब केल्याची दिली माहिती.
7:30 AM - पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील बंदवन परिसरातील सबर समाजातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार. गावात मोफत वीज उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर विद्युत महामंडळाने ४ हजार रुपयांचे बिल लावले. याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती.
7:20 AM - केंद्रीय मंत्री आणि नेमबाज राजवर्धनसिंह राठोड मतदान केंद्रावर पोहोचले.
7:15 AM - बिहारमधील सरन येथे ज्येष्ठांचे मतदान.
7:10 AM - माजी केंद्रीय मंत्री यशवंश सिन्हा पत्नी निलीमा सिन्हा यांच्यासह मतदारांच्या रांगेत
7:00 AM - नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बिहारमधील मतदान केंद्रावरील सजावट.