मेघालय - पुराने मेघालयामधील 1 लाख लोकांना मोठा फटका बसला आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची वेस्ट गारोच्या जिल्हाधिकार्यांनी माहिती दिली आहे.
पुरांमधील मृतांमध्ये बहुतांश लोक हे टिक्रीकिल्ला समाजामधील आहेत. गेल्या एक आठवड्यापासून येथील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने 175 गावांना पुराचा फटका बसला आहे.
पुरामुळे 1 लाख 70 हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 20 मदतकेंद्राच्या छावण्या सुरू केल्या आहेत.
विरोधी पक्षनेते मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या आमदारांनी परिसराला भेट दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते झेनिथ संगमा यांनी सरकारकडून पूरग्रस्त लोकांना मदत मिळत नसल्याचा आरोप केला.
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही, असेही संगमा यांनी म्हटले आहे.
मान्सूनमध्ये अतिवृष्टी झाल्याने बिहार आणि आसामलाही पुराचा फटका बसला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एक लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.