झुंझूनू (राजस्थान)- बुहाना तालुक्यातील सहड का बास या गावातील एका व्यक्तीस त्याच्या पाच मुलींनी खांदा देऊन त्यांची अंत्यविधी पूर्ण केली आहे. मुली आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या व त्यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी देखील दिली. असे करून मुलींनी प्रस्थापित परंपरेला फाटा देऊन समाजापुढे स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण दिले आहे. नगरमल हवलदार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागरमल हवलदार यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांची देखरेख त्यांची मुलगी आणि जावई करत होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्ली, गुडगांव, नारनौल आणि सोनीपत येथे राहणाऱ्या त्यांच्या पाचही मुली कृष्णा, किरण, मीना, सुलोचना आणि सुमन व त्यांचे पाचही जावई आपल्या गावी आलेत. त्यांनी वडिलांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांना खांदा दिला आणि अंत्यविधीतल्या सर्व परंपरा पार पाडल्या. नागरमल यांना अशोक नावाचा एक मुलगा देखील होता. मात्र, १६ वर्षापूर्वी अशोकची पत्नी व त्याच्या सासऱ्याने त्याची हत्या केली होती. त्यामुळे अंत्यविधीला मुलाची कमतरता पाचही मुलींनी पूर्ण केली.
गाजाबाज्यासह नगरमल हवलदार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. वडिलांना मुली खांदा देत आहेत हे पाहून गावातील काही लोकं अवाक झालेत. तर, काही लोकांनी समाज बदलला असून मुला-मुलींमध्ये काहीही फरक नसल्याची भावना व्यक्त केली.
हेही वाचा- लोकसंख्या नियंत्रणासाठी चांगल्या उपाययोजनेची गरज!