अजमेर - देशभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असतानाच अजमेरच्या क्लॉक टॉवर क्षेत्रातही कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर, दर्गा भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. तसेच, दरगाह पोलिसांनी हॅपी व्हॅली दरग्यामध्ये लपून बसलेल्या ४२ जणांना बाहेर काढले आहे. पोलिसांनी पकडलेले हे ४२ ही लोकं उरुसमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. तर, एक बांगलादेशी नागरिकदेखील यात सापडला आहे. तो विजाच्या आधारे अजमेरला पोहोचला होता मात्र, आता त्याच्या विजाचा अवधी संपला आहे.
दरगाह पोलिसांनी तारागडच्या पायथ्याशी स्थित हॅप्पी व्हॅली मध्ये लपून बसलेल्या ४०-५० जणांना बाहेर काढले आहे. याबाबत शासनालाही माहिती देण्यात आली असून या सर्वांना बडबाव येथील एका शासकीय शाळेत ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आरोग्य विभागानेही या लोकांची तपासणी सुरू केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या या नागरिकांपैकी अनेकजण हे कलंदर (मुस्लिम साधू) असून ख्वाजा गरीब नवाब यांच्या उरसमध्ये सहभागी होण्यास अजमेरला आले होते.
या उरुसनंतर हे सर्व सरवाडच्या ख्वाजा फखरुद्दीन चिश्तींच्या उरुसमध्ये सहभागी होऊन आपापल्या गावी जाणार होते. मात्र, अजमेरच्या दरगाह असलेल्या ठिकाणी कर्फ्यू लागला. त्यामुळे ते सर्व तारागडच्या डोंगरावर असलेल्या ताका सैयद यांच्या हॅप्पी व्हॅली या दरग्याकडे निघून गेले. हे सगळेजण आता पोलिसांच्या ताब्यात असून आणखी काही नागरिक आहेत जे अजमेरला आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते सर्व तिथेच अडकून पडले. असे जवळपास ३ ते ४ हजार हज यात्रेला जाणारे जायरीनदेखील लॉकडाऊनमुळे परत जाण्याचे दुसरे कुठले साधन नसल्याने अजमेरमध्ये अडकून पडले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुंवर राष्ट्रदीप यांनी दिली.