पणजी - गेल्या ४ दिवसात उत्तर गोव्यातील म्हादई अभयारण्यात ४ वाघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या वाघांच्या शरीरावर कोणत्याही खूणा नसून, त्यांचे अवयव जसेच्या तसे आहेत. या घटनेला जबाबदार म्हणून संशयावरून ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मृत वाघांमध्ये पूर्ण वाढ झालेला एक नर, एक मादी आणि दोन बछड्यांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील गोळावली गावाच्या हद्दीतील म्हादई अभयारण्य क्षेत्रात रविवारी (दि. 5) एका वाघाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे सोमवारी शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण स्पष्ट व्हावे, यासाठी अहवाल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी (दि.7) पुन्हा एका बछड्याचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध सुरू केला असता आज २ बछडे पुरलेल्या स्थितीत आढळले. त्यांचे शवविच्छेदन करत असता अजून एक मृतदेह आढळून आला. मात्र, संध्याकाळ झाल्याने त्याचे शवविच्छेदन गुरुवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मेलेल्या वाघांची संख्या ४ झाली आहे. या घटनेप्रकरणी संशयावरून वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत विठो झिपो पावणे (60 वर्षे), नालो नागो पावणे (55 वर्षे) आणि बमो नागो पावणे (46 वर्षे) या तिघांना ताब्यात घेतले आहे.
यासंबंधी उत्तर गोव्याचे मुख्य वन संरक्षक संतोष कुमार म्हणाले, की गोव्यात वाघांचा झालेला मृत्यू ही दुर्देवी घटना आहे. यापैकी मृत्यू झालेल्या २ वाघांना विषप्रयोग झाला असण्याची शक्यता आहे. त्यासाठी शवविच्छेदन अहवाल फॉरेन्सिक तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. तो अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तसेच या भागात असलेल्या वाघांचा शोध घेणे सुरूच आहे. या मोहिमेत सहभागी झालेले प्राणीमित्र अमृत सिंग म्हणाले, की 4 वाघांचा मृत्यू ही गोव्यासाठी धक्कादायक घटना आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली आहे. हे नुकसान भरून येणे कठीण असल्याचे सिंग म्हणाले.
हा भाग ज्या वाळपई मतदारसंघात येतो त्याचे आमदार तथा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्र्यांनी याची दखल घ्यावी, अशी ट्विटरद्वारे मागणी केली आहे. तसेच या घटनेची सविस्तर चौकशी करावी अशी मागणीही केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाघांच्या मृत्यूच्या सखोल चौकशी करण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत.