चंबा- हिमाचल प्रदेशात तीसाहून चंबाकडे जाणारी एक अल्टो कार खोल दरीत कोसळली. कारमध्ये चार लोक जात होते. सर्वजण जागीच मरण पावले. कारमधील स्फोटामुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली.
या अपघातात आई व मुलानेही जीव गमावला आहे. शिवाय एक शिक्षक व एक लॅब अटेंडंटचाही समावेश होता. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर तिसा पोलीस स्टेशन येथून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी तीसा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना दहा हजारांची मदत जाहीर केली आहे. चंबा जिल्ह्यातील डोंगराळ भागात दरवर्षी रस्ते अपघात होत असतात, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. चंबा एसपी अरुण कुमार यांनी सांगितले की, तीसा रोडवरील अल्टो कार खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखत झाले. 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले. चौघांचे पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून घटनेचा तपास सुरू आहे.