नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आज सकाळी इराणमधील तब्बल २७५ भारतीय मायदेशी परतले आहेत.
इराणच्या तेहरानमधून या नागरिकांना घेऊन निघालेले विमान आज पहाटे जोधपूर विमानतळावर उतरले आहे. यामध्ये महिला, मुले, युवक आणि वृद्धांचा समावेश आहे. या सर्वांची भारतामध्ये उतरल्यानंतर विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. त्यांना जोधपूरमधील लष्करी तळावर नेण्यात आले. त्यांना याठिकाणी विशेष कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल.
इराणच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये एकूण सहा हजारांहून अधिक भारतीय अडकले होते. त्या सर्वांना टप्प्या-टप्प्याने इराणमधून एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यापूर्वी एअरलिफ्ट करण्यात आलेल्यांना राजस्थानमधील जैसलमेर आणि जोधपूर येथील लष्करी तळावर तपासणी करण्यात आली आहे. गेल्या २५ मार्चला २७७ भारतीयांना ईराणमधून आणले होते. त्यांची विलगीकरण केंद्रात पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. लष्कराने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सर्व प्रकारचे उपचार आणि मदत केली जात असून करोनापासून बचाव करण्यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यायची, याची माहितीही देण्यात येत आहे.
इराणमध्ये भयंकर कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे २ हजार ५१७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ हजार २१२ जणांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा, कॉलेज, विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे दरम्यान चीनच्या वुहान प्रांतात प्रथम रुग्णांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळली होती. येथूनच या विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली. जगभरात या प्राणघातक विषाणूचा प्रसार झाला आहे. आशियात भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये तसेच, अमेरिका, युरोपातील इटली, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे.