पाटणा : बिहारच्या मुंगेर जिल्ह्यामध्ये एका महाविद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या असरगंज तालुक्यातील ममई महाविद्यालयात हा प्रकार समोर आला आहे. यामुळे ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजय कुमार भारती यांनी याबाबत माहिती दिली. या महाविद्यालयातील ७५ विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये २५ जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये तीन महिला शिक्षक, चार विद्यार्थिनी आणि १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असेही भारती यांनी सांगितले.
परिसराला केले सील..
हा प्रकार समोर आल्यानंतर या संपूर्ण परिसराला कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच, या २५ जणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुरुवार सायंकाळपर्यंत सर्वांचे नमुने घेण्यात येणार असल्याचे भारती यांनी सांगितले. ते स्वतः या गावामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..
गेल्या आठवड्यातच बिहार सरकारने ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर एक आठवडाही उलटला नाही, आणि शाळेतले २५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने या गावातील आणि जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यानंतर आता आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास पालन नकार दर्शवत आहेत, त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्यात घाई केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : दिल्लीत कोरोना नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण; ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद करण्याचे आवाहन