जयपूर - कोरोनामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करून जोधपूरला आणण्यात आले. त्यांना सध्या भारतीय सैन्याच्या वेलनेस सेंटरमधील आयसोलेशन कक्षात ठेवले होते. त्यांच्या क्वॉरेंटाईन कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या सर्वांना आता घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यातील २०० नागरिकांना बुधवारी घरी पाठवण्यात आले. हे नागरिक लडाखचे रहिवासी असल्याने त्यांना विशेष विमानाने रवाना करण्यात आले.
जोधपूरमधून पाठवण्यात आलेल्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे वैद्यकीय अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यानेच त्यांना घरी पाठवण्यात येत आहे. यापुढेही अशीच प्रक्रिया राबवण्यात येत येणार आहे. दुसऱ्या गटात काश्मीर, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील नागरिकांना घरी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती जोधपूरचे आरोग्य अधिकारी डॉ. बलवंत मंडा यांनी दिली.
सर्वात सुरुवातीला इराणमधून ५५२ भारतीय नागरिकांना आणण्यात आले होते. त्यातील ३० नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सैन्याच्या वेलनेस सेंटरमध्ये यशस्वी उपचार करुन घरी पाठवण्यात आले. त्यानंतर २५ मार्चला २७७ आणि २७५ अशा दोन गटात इराणवरुन नागरिकांना जोधपूर येथे आणण्यात आले होते.