भोपाळ - मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात विषारी दारू पिऊन आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. काल (मंगळवार) ही घटना घडली होती. संपूर्ण राज्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील बागचीनी परिसरातील छेरा मानपूर आणि सुमावलीतील पहवाली या गावात घडली. रुग्णांना ग्वाल्हेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आता मृतांचा आकडा वाढून २० झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश केला असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या आधीही झाला होता १६ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशात विषारी दारूमुळे मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. 14 ऑक्टोबर 2020 रोजी उज्जैनमध्ये विषारी दारू पिऊन 16 जणांचा मृत्यू झाला होता. दारू तयार करण्यासाठी इथेनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळले गेले होते. अधिकारी प्रिती गायकवाड यांनी याबाबत तपास केला होता. मिथेनॉल हे मानवी शरीरासाठी विष मानले जाते. त्याचे 10 एमएल इतके प्रमाण मनुष्याला आंधळे करु शकते. नगरपालिका कर्मचारी युनुस सिकंदर हे दोघे याप्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. या दोघांनी पालिका कार्यालयाच्या गच्चीवर ही दारु बनवली होती.
बडवानीमध्येही अशीच घटना
6 सप्टेंबर 2020 रोजी बडवणीच्या निवालीमध्येही विषारी दारू पिऊन दोन जणांचा मृत्यू झाला. सेंधवा येथील दिवानिया या गावात दोघांचा मृत्यू झाला, तर 6 जण आजारी पडले होते.