पुलवामा - जम्मू काश्मिरातील पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शनिवार) चकमक झाली. यावेळी दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांपुढे आत्मसमर्पण केले. दोघांकडील एके-४७ रायफल जप्त करण्यात आली. लेलहार भागात चकमक झाल्याची माहिती काश्मीर विभागीय पोलिसांनी दिली.
यातील एक दहशतवादी चकमकीदरम्यान जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शुक्रवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा -
जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये काल (शुक्रवार) झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अवंतीपोराच्या मंदूरा त्राल या भागात ही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यानंतर काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली.
हे तीन दहशतवादी स्थानिक असून, ते हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरिफ बशीर शेख, वारिस हसन भट आणि सईद आसिफ उल हक अशी या तिघांची नावे आहेत. या दहशतवाद्यांकडून एक एके-४७ रायफल, दोन पिस्तूल आणि चार ग्रेनेड्स जप्त करण्यात आले आहेत.
२०२१ मधील ही पहिली चकमक होती, असे विजय कुमार यांनी स्पष्ट केले. या वर्षी आम्ही जास्तीत जास्त दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यावर, आणि नवीन भरती न होऊ देण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले. यासाठी काश्मीरमधील तरुण आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशनही आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले.