भोपाळ - मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये बस पलटून दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या दुर्घटनेमध्ये २१ लोक जखमी झाले आहेत. पन्ना जिल्ह्याच्या रामखिरिया गावाजवळ आज सकाळी हा अपघात झाला.
पोलीस उपनिरिक्षक सिद्धार्थ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस पहाडीखेडा गावावरून पन्ना गावाकडे निघाली होती. सकाळी १०.३० च्या दरम्यान या बसला अपघात झाला. यामध्ये अकरावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. राम भरोसे आणि लक्ष्मण यादव अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही गजना धर्मपूर गावातील रहिवासी आहेत. या दुर्घटनेनंतर बसचालक पळून गेला आहे, त्याचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.
या दुर्घटनेमध्ये एकूण २१ लोक जखमी झाले. जखमींमध्ये १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना सोमवारी रात्री उशीरापर्यंत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती पन्नाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी एल. के. तिवारी यांनी दिली.
हेही वाचा : छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक नक्षली ठार, दोन 'कोब्रा' जवान हुतात्मा..