लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बहरीचमध्ये तबलिगी जमातच्या १७ विदेशी सदस्यांंना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्यांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तबलिगी जमातच्या २१ सदस्यांवर गुन्हे दाखल केले होते. यामधील १७ नागरिक हे वेगवेगळ्या देशांमधून आले होते. परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांना ताज आणि कुरैश मशीदीमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले होते.
यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
फॉरेनर्स अॅक्ट म्हणजेच परदेशी नागरिक कायद्यानुसार, तबलिगींना जर भारतात येण्यासाठी व्हिसा हवा असेल, तर त्यांना मिशनरी व्हिसा घेऊन देशात यावे लागते. मात्र, बहुतांश तबलिगींनी पर्यटन व्हिसा घेत भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीमधील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
हेही वाचा : COVID-19: 'बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है', नृत्यातून कोरोनाविषयक केली जनजागृती