दुमका (झारखंड) - येथील जंगल परिसरातील गोपीकंदार भागात माओवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवण्याच्या उद्देशाने लावलेले जवळपास १७ आयईडी बॉम्ब, २०० हून अधिक डिटोनेटर्स आणि ग्रेनेड सापडले आहेत. त्याच्या जवळपास माओवाद्यांनी फलकेही लावली होती. हे बॉम्ब आणि बॉम्बशी संबंधित साहित्य पोलिसांना निष्क्रीय करण्यात यश आले आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकांच्या काळात गोंधळ उडवून देण्यासाठी आणि पोलीस, लष्करी दले यांच्यावर हल्ला करण्यासाठी माओवाद्यांनी हे बॉम्ब ठेवले होते, अशी माहिती दुमकाच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.
झारखंडच्या कुंटी येथे गेल्या २९ जानेवारीला 'पीपल लिबरेशन पार्टी' या बंदी घातलेल्या संघटनेचा 'कमांडर' प्रभू साह्या बोद्रा याच्यासह काही माओवाद्यांना पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. बोद्रा याच्यावर या भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २३ खटले दाखल होते. त्यावेळी चकमकीत पोलिसांनी २ एके ४७ रायफल, एक ९ एमएम पिस्तूल, ४ पिस्तूल, २६४ बुलेट राऊंड, १२ मोबाईलसह इतर साहित्य जप्त केले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी माओवाद्यांनी बॉम्ब पेरले असल्याचे बोलले जात आहे.