जयपूर : राजस्थानमध्ये केमिकलची बाधा झाल्यामुळे १६ मनरेगा कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले. टोळधाडीसाठी फवारणी करण्यात आलेले कीटकनाशक श्वासावाटे आत गेल्यामुळे हे सर्व आजारी पडल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या जयसिंगपुरामध्ये असलेल्या एका शेतात टोळधाडीसाठी कृषी विभागाने कीटकनाशक फवारले होते. सोमवारी रात्री याची फवारणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळच्या सुमारास या शेताच्या शेजारी असलेल्या साईटवर मनरेगाचे काही कामगार पोहोचले. त्यावेळी फवारणी होऊन गेली होती, मात्र वाऱ्याची दिशा त्यांच्या बाजूने असल्यामुळे, श्वासावाटे हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात गेले आणि ते आजारी पडले.
त्यानंतर त्यांना उलटी, डोकेदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे दिसून आल्यामुळे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना पाओटाला असणाऱ्या कम्युनिटी हेल्थ सेंटरला (सीएचसी) हलवण्यात आले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती सीएचसीच्या एका डॉक्टरांनी दिली.
हेही वाचा : भारतात दरदिवशी अडीच लाखांपेक्षाही जास्त करोनाचे रुग्ण आढळतील, एमआयटीचा इशारा