महात्मा गांधीजींच्या गावांचे स्वराज्य या संकल्पनेत कोणत्याही धोरण निर्मितीमध्ये त्याचा परिणाम होणाऱ्या प्रत्येक घटकाला सामावून घेण्याविषयी विचार मांडले आहेत. गांधीजींची ही संकल्पना समकालीन ग्रामीण भारतात सामाजिक-राजकीय बदलाचे माध्यम बनू शकते. हा बदल यशस्वी होऊ शकतो, याचीही खात्री देते.
महात्मा गांधींच्या विचारांनुसार, स्वराजाचा अर्थ स्व-राज्य (self-rule) आणि आत्म-संयम (self-restraint) आहे. मात्र, 'सर्व प्रकारच्या बंधनांमधून मुक्ती' किंवा 'संयमाला कायमची तिलांजली' असा याचा अर्थ मुळीच नाही. केवळ काही लोकांनाच अधिकार मिळाल्यास अशा प्रकारचे स्वराज्य येऊ शकत नाही, असे गांधीजींचे म्हणणे होते.
अधिकारांच्या दुरुपयोगाला विरोध करण्याची क्षमता आल्यानंतरच अशा प्रकारचे स्वराज्य येऊ शकते, असे गांधीजींचे मत होते. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, अशा प्रकारचे स्वराज्य येण्यासाठी जनतेला आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीने सशक्त होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी आधी त्यांच्याकड पूर्ण समज किंवा माहिती असली पाहिजे.
गावांमध्ये स्वराज्य याचा अर्थ व्यापक आहे. कारण, भारताचा आत्मा गावांमध्ये आहे, अशी गांधीजींची धारणा होती. खरे तर, नेहमी गाव हेच गांधीजींच्या विचारांचे केंद्र होते. यामध्ये भारतीय सामाजिक आणि राजकीय संस्थांचाही समावेश आहे.
गांधीजींच्या संकल्पनेतील ग्राम-स्वराज्य याचा शाब्दिक अर्थ गावाचे स्वतःचे शासन (self-rule) असा होता. यामध्ये प्रत्येक गाव पूर्णपणे प्रजासत्ताक आणि स्वतःच्या गरजांसाठी शेजाऱ्यांवर अवलंबून नसणे अपेक्षित होते.
तरीही, गांधीजी एका बाजूला स्वावलंबनास अनिवार्य मानत होते, त्याच वेळी, काही गरजांसाठी गावे एकमेकांवर अवलंबून असतील, हेही त्यांना मान्य होते.
राष्ट्रीय पातळीवरील स्वराज्यासाठी आधी ग्राम स्वराज्य आवश्यक आहे, असे गांधीजींना जाणवत होते. १९४२ मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये गांधीजींनी 'आर्थिक आणि राजकीय ताकद एका ठिकाणी जमा झाल्यास (concentration) स्वराज्याच्या पायाभूत सिद्धांतांच्या उल्लंघनाचा धोका आहे. गावे सशक्त होऊन आर्थिक आणि राजकीय ताकदीचे विकेंद्रीकरण केल्यास हे सिद्धांत राखले जातील.
गावांमध्ये हे विकेंद्रीकरण होणे हे व्यवस्थेतील सर्वांत लहान परिमाण आहे. यासाठी, राजकीय स्वरूपात गाव इतके लहान असले पाहिजे की, जिथे महिलांसह सर्व लोकांना निर्णय प्रक्रियेत भाग घेता येईल.
महिलांना समान संधी मिळाव्यात -
'विकेंद्रीकरण झालेल्या व्यवस्थेत सर्व ग्रामस्थांना समानतेने संधी मिळाली पाहिजे. यामध्ये गरीब, महिला आणि सीमेवर राहणाऱ्या लोकांचा समावेश आहे. सर्वांना ग्राम पंचायतीच्या प्रस्तावांवर चर्चा करण्याची संधी मिळाली पाहिजे. प्रस्तावावर टीका-टिप्पणी, अनुमोदन आणि नारकारण्याचा अधिकारही त्यांना असला पाहिजे. याशिवाय, ग्राम पंचायतीने केलेल्या कामातही त्यांना त्यांचा वाटा आणि लाभ मिळाला पाहिजे,' असे गांधीजींचे म्हणणे होते.
'असे झाल्यानंतरच पंचायत चांगल्या प्रकारे स्थानिक बलस्थाने, संसाधने ओळखू शकेल. यामुळे गावाच्या आर्थिक विकासासाठी सर्व साधनसंपत्तीचा सर्वोत्तम उपयोग केला जाऊ शकेल. अशा प्रकारे प्रत्येक गाव भागीदारीतील लोकशाही आणि आर्थिक स्वायत्ततेची पायाभूत संस्था बनू शकेल,' असे गांधीजींनी म्हटले होते.
इंग्रजी शासकांद्वारे प्रचार करण्यात आलेल्या औद्योगीकीकरणाला गांधीजींनी जोरदार विरोध दर्शवला होता. स्वदेशी आणि हाताने तयार होणारी औद्योगिक उत्पादने गावांमध्ये तायर व्हावीत, असा गांधीजींचा आग्रह होता. गांधीजींच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, 'मोठ्या प्रमाणातील उत्पादन नाही तर, सर्वसामान्य लोकांद्वारे करण्यात आलेले उत्पादन.' “Not mass production, but production by the masses.”
भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून ग्राम स्वराज्य गांधीजींच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी होते. गांधीजींचे ग्राम स्वराज्य केवळ जुन्या गावाचे पुनर्निर्माण करणे इतकेच नव्हते. तर, 'प्राथमिक गरजांबाबत स्वावलंबित्व' हे गावांच्या पुनर्निमाणासाठी गांधीजींनी आधारभूत मानलेल्या अटींपैकी एक होते.
'कपडे, अन्न आणि इतर प्राथमिक गरजा भागवण्यासाठी आवश्यक उत्पादने गावातच तयार झाली पाहिजेत. यामुळे गावामध्ये सर्वांना रोजगार मिळेल आणि चांगल्या संधींच्या शोधात गावांतून शहरांकडे होणारे स्थलांतरही थांबेल. सर्व गावे स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. तेथे जीवनातील अनिवार्य असलेल्या अन्न, वस्त्र, स्वच्छ पाणी, स्वच्छता, राहण्यासाठी घर, शिक्षण मिळाले पाहिजे. समाजाला उपयोगी अन्य सर्व सामुदायिक गरजा पूर्ण होण्याची का तरतूद असावी,' असे गांधीजींनी लिहिले आहे.
आदर्श गाव कसे असावे?
'गावांमध्ये वाद-विवाद सोडवण्यासाठी पंचायत असावी. सर्व धर्मांतील लोकांसाठी पूजा-पाठ, प्रार्थना करणयासाठी स्वतंत्र जागा (मंदिरे, प्रार्थनास्थळे) असावीत. एक सहकारी गोशाळा (dairy), प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असावी. या ठिकाणी औद्योगिक शिक्षणही दिले जावे. गावात धर्मशाळाही असावी. येथे वाटसरू/आगंतुक पाहुणे (visitor) यांच्यासाठी प्रवासादरम्यान आराम करता येईल. थोडक्यात, एखादे गाव आदर्श तेव्हाच असेल, जेव्हा ते स्वयंपूर्ण (self dependent) असण्यासोबतच अनेक बाबतीत एकमेकांवर अवलंबूनदेखील (inter-dependent) असेल,' असे गांधीजींना अपेक्षित होते.
लेखक- राजीव राजन (या लेखात लिहिलेले विचार लेखकाचे स्वतःचे आहेत. याचा ईटीव्ही भारतशी काहीही संबंध नाही.)