रंगारेड्डी (तेलंगाना) - मानव तस्करी विरोधी पथकाने दोन ठिकाणी छापा मारत १५ बालकामगारांची सुटका केली आहे. पथकाने शुक्रवारी ही कारवाई करत मुलांची सुटका केली. यात मुलं आणि मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी १ आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दोघे जण फरार आहेत.
हयातनगरमधील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कंपनीत तसेच दारूच्या बाटल्याची सफाईचे काम लहान मुलांकडून करून घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी शिवा ट्रेडर्स, पवन पुत्र प्लास्टर कंपनी आणि लक्ष्मण प्लास्टर कंपनीवर छापा मारला. यात १५ बालकामगार आढळून आले.
पहिल्या कारवाईत पोलिसांनी शिवा ट्रेडर्सचा मालक चन्नाबाथिना रवी (वय ३०) याला अटक केली आहे. तर अन्य दोघे फरार आहेत. पोलिसांनी सांगितले की, आठ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या मुलांना धोकादायक परिस्थितीत काम करण्यास भाग पाडण्यात आले.
एका पथकाने शिवा ट्रेडर्सवर छापा टाकला. यात छाप्यात रिकामा दारूच्या बाटल्या साफ करणाऱ्या पाच मुलींची सुटका करण्यात आली. दुसर्या प्रकरणात, मानव-तस्करी विरोधी पथकाने पवन पुत्र प्लास्टर कंपनी आणि लक्ष्मणच्या प्लास्टर कंपनीवर छापा टाकला आणि 9 मुले आणि एका मुलीसह 10 जणांना यातून वाचवले. यातील काही मुलं ही उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सर्व मुलांना कंपन्यांच्या आवारात असलेल्या शेडमध्ये बंद करण्यात आले होते. त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
हेही वाचा - शेतकरी आंदोलन: दिल्लीच्या सीमेवर आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
हेही वाचा - भंडारा दुर्घटनेची बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल, 48 तासांत मागितला अहवाल