कोची - गल्फ एअरच्या विशेष विमानाने बहरीनहून 127 भारतीय कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या सर्वांना नॅशनल एअरमेनच्या शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यासंबधीत पुढील प्रकिया पार पाडली जाईल.
जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात विशेष केएसआरटीसीच्या बसेसमार्फत निर्वासितांना विमानतळावरून आणण्यात आले आणि कोची येथील नौदल तळावरील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधीनंतर त्यांना राज्य प्रशानसानकडे सोपवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
20 मार्चला कोची येथील नौदल तळावर 200 बेड क्षमतेचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले होते. दक्षिणी नौदल कमांडमधील प्रशिक्षित नौदल डॉक्टर आणि कर्मचारी या शिबिराचे व्यवस्थापन करीत आहेत. सुट्टीनंतर कर्तव्यावर परतणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला होता.
यापूर्वी बहरीन येथील १२५ विद्यार्थी आणि पर्यटकांना पुण्यातून खास विमानाने मायदेशी पाठवण्यात आले होते. बहरीन येथून आलेल्या गल्फ एअरच्या विमानाने पुणे विमानतळावरुन ते बहरीनला रवाना झाले. बहरीन देशातील जवळपास १२५ विद्यार्थी आणि पर्यटक पुणे, मुंबई, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, गोवा, मंगलोर, म्हैसूर अशा शहरांमध्ये अडकून पडले होते. त्यात प्रामुख्याने विद्यार्थी होते.