नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 122 जवानांचे कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती सीअरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीतील मयुर विहार फेज-3 येथील सीआरपीएफच्या 31 बटालियनचा परिसर पुर्णपणे सील करण्यात आला आहे.
122 जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 100 जवानांचे अहवाल येणे बाकी आहे, असे अधिकारऱ्यांनी सांगितले. यातील बऱ्याच जवांनामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. पॉझिटिव्ह जवानांना मांडोली येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी 12 जवान पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 55 वर्षीय उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला होता. एकाच बटालियनमधील जवानांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग होतोय ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
संभाव्य कोरोनाबाधित आणि सुट्टीवरुन आलेल्या जवांना 14 दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीआरपीएफच्या जवांनाना पहिला कोरोना संसर्ग एका कॉन्स्टेबल कडून झाला होता. तो सीआरपीएफमध्ये वैद्यकीय सहाय्यक काम करतो. दिल्लीतील घरी राहून तो सुट्टीवरून परतला होता.
जम्मू काश्मीर मध्ये नियुक्त असलेल्या जवानाला कोरोना झाला होता. त्याला कशा प्रकारे कोरोना संसर्ग झाला हे स्पष्ट झालेले नाही. त्याच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल देखील निगेटिव्ह आला होता. 31 बटालियन मधील लक्षणे दिसत नसलेल्या कोरोना संसर्गित जवानाकडून त्याला संसर्ग झाला असल्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सीआरपीएफच्या जवानांना इतक्या मोठ्या प्रमाणात संसर्ग कशामुळे झाला याचा शोध घेतला जाणार आहे. वैद्यकीय सहाय्यकाला विलगीकरणात ठेवले होते की नाही याचीही चौकशी केली जाईल, सीआरपीएफच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.