नवी दिल्ली - संपूर्ण देशातील सोशल मीडियाला हादरवून सोडणाऱ्या 'बॉय्ज लॉकर रुम' प्रकरणातील एका मुलाला दिल्ली सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासोबतच आणखी २२ जणांची ओळखही पटवण्यात सायबर सेलला यश मिळाले आहे. या सर्वांना लवकरच चौकशीसाठी बोलावून घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या शाळकरी मुलाचे वय १५ वर्षे असून, तो दिल्लीमधील एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थी आहे. त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे 'बॉय्ज लॉकर रुम' प्रकरण?
दिल्लीतील काही शाळकरी मुलांनी एकत्र येऊन सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर 'बॉय्ज लॉकर रुम' नावाने एक अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटच्या ग्रुप चॅटमध्ये आणखीही बरेच लोक अॅड झाले होते, ज्यांमध्ये शाळकरी मुले आणि तरुणांचे प्रमाण जास्त होते. या ग्रुप चॅटमध्ये ही मुले इन्स्टाग्रामवरील इतर मुलींचे फोटो शेअर करत, आणि त्यांच्यावर असभ्य टिप्पणी करत. तसेच कित्येक अल्पवयीन मुलींची छायाचित्रेही या ग्रुपमध्ये शेअर होत, ज्यावर ही मुले चवीने अश्लील टिप्पण्या करत. कहर म्हणजे, या मुलींवर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार कसा करता येईल याबाबतही ही मुले चर्चा करत.
या चॅटरुममधील संभाषणांचे स्क्रीनशॉट्स लीक झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला, आणि संपूर्ण सोशल मीडिया हादरुन गेला होता. दक्षिण दिल्लीमधील एका तरुणीने या चॅट्सचे स्क्रीनशॉट लीक केले होते. "इन्साग्रामवर १७-१८ वर्षाच्या काही मुलांनी 'बॉय्ज लॉकर रुम' नावाने ग्रुप सुरू केला आहे. यामध्ये ते लहान-मोठ्या मुलींचे एडिट केलेले फोटो शेअर करतात. या ग्रुपमध्ये माझ्या शाळेतील दोन मुलेही आहेत, आणि आता मला आणि माझ्या मैत्रिणींना खूप भीती वाटत आहे. या सर्व प्रकारामुळे आता माझी आई मला इन्स्टाग्राम सोड म्हणत आहे" अशा आशयाच्या कॅप्शनसह तिने हे स्क्रीनशॉट्स शेअर केले होते.
सोमवारी दक्षिण दिल्लीच्या एका प्रतिष्ठित शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत साकेत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. साकेत पोलिसांनी त्याबाबत सायबर सेलला माहिती दिली होती. याव्यतिरिक्त एका विद्यार्थ्याच्या पालकानेही याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी इन्स्टाग्रामला याबाबत माहिती देत, या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांची यादी मागितली होती. यामध्ये त्यांची नावे, त्या ग्रुपचे अॅडमिन आणि त्यांचे आयपी अॅड्रेसही मागवले असल्याची माहिती सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त अनीश रॉय यांनी दिली.
बॉय्ज लॉकर रुम २.०..
सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजेसमध्ये हेही म्हटले जात होते, की पहिल्या ग्रुपबाबत स्क्रीनशॉट्स लीक झाल्यानंतर या मुलांनी "बॉय्ज लॉकर रुम २.०" नावाने नवे अकाऊंट सुरू केले. त्या अकांऊटवर त्यांनी सूचना लिहिली होती, की कृपया आपापली 'फेक अकाऊंट्स' वापरून येथे सहभागी व्हा, म्हणजे मग 'ते' आपल्याला पकडू शकणार नाहीत. याबाबतची सत्यता अद्याप पडताळली गेली नसली, तरी यातून या प्रकरणाचे गांभीर्य दिसून येते.