गांधीनगर : गुजरातच्या जामनगर येथे असलेल्या कस्टम विभागाच्या कार्यालयातून तब्बल एक कोटी दहा लाख रुपये किंमतीच्या सोन्याची चोरी झाली आहे. याप्रकरणी जामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण १९८२ आणि १९८६मधील सोन्याच्या चोरीसंबंधी आहे.
काय आहे प्रकरण..?
१९८२ आणि १९८६मध्ये भूजच्या कस्टम विभागाने हे सोने जामनगर येथील कस्टम विभागाकडे ठेवण्यासाठी दिले होते. त्यानंतर भूजमध्ये जेव्हा कस्टम विभागाची नवी इमारत बांधली गेली, तेव्हा त्यांनी जामनगर विभागाकडे दिलेले आपले सोने परत मागितले. यावेळी परत येताना दोन किलो सोने कमी आल्याची बाब भूजमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली.
असा उघडकीस आला प्रकार..
यानंतर भूज आणि जामनगरमधील कार्यालयामध्ये यासंदर्भात बरीच वर्षे पत्रव्यवहार झाला. काही दिवसांपूर्वी अहमदाबादला असलेल्या कस्टमच्या मुख्यालयात हे प्रकरण पोहोचल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. तेव्हा, जामनगरमधीलच कर्मचाऱ्यांनी हे सोने लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता जामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा : "श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या ३६ भारतीयांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करा"; पलानीस्वामींची मोदींना विनंती