हैदराबाद - तेलंगणामधील मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. सरकारने बिअरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्क विभागाने एका बाटलीमागे 10 रुपयांची कपात करण्याचे आदेश दिले आहे. सध्या 30 रुपये प्रती बाटली उत्पादन शुल्क आहे. त्यातील एका बाटलीमागे दहा रुपयांची कपात केल्याने 20 रुपयांचा उत्पादन शुल्क राहणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही कपात सोमवारपासून अंमलात आली आहे. एका बाटलीमागे दहा रुपयांची कपात केल्याने मद्यप्रेमींना फायदा होणार आहे.
विक्रीत घट झाल्याने निर्णय -
राज्य सरकारला दारुपासून प्रत्येक महिन्याला 2 हजार 700 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र मागील काही महिन्यांपासून यामध्ये 200 कोटी रुपयांची घट झाली आहे. कोरोनाकाळात मद्याच्या किंमती वाढल्याने विक्रीत घट झाली आणि त्यामुळे उत्पन्न घटल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे बियरच्या उत्पादन शुल्कात 10 रुपयांची घट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
कोरोना काळात वाढल्या किंमती -
मागील वर्षी मे महिन्यात बियरच्या किंमतीत वाढ झाली होती. एका बाटलीमागे 30 रुपये तर काही बाटलींमागे 50 रुपयांची मोठी वाढ झाली. अनेकांनी यावर नाराजी देखील व्यक्त केली. त्यामुळे विक्रीत घट झाली. दिल्लीपाठोपाठ तेलंगणा सरकारनेही किंमती कमी केल्याने बियरच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.