बारामुल्ला - उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील करहामा कुंजर भागात शनिवारी सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, या चकमकीत एक अतिरेकी मारला गेला आहे. मात्र ठार झालेल्या अतिरेक्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने करहामा कुंझरमध्ये रात्रीची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्याचे वृत्त आहे. आज सकाळपासूनही मोहीम सुरू आहे.
कालच जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम पायीन केरी परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झालीे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून एक एके 47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे.
सुरक्षा दलाचे जवान घालत होते गस्त : भारतीय सुरक्षा दलाचे जवान गस्तीवर असताना त्यांना वानिगम पायीन केरी परिसरात संशयास्पध हालचाली आढळून आल्या. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र भारतीय सुरक्षा दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे या शोधमोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केल्याने आधीच सावध असलेल्या जवांनांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सध्या या परिसरात सुरक्षा दलाकडून कारवाई सुरुच आहे.
कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवादी ठार : बुधवारी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. बुधवारी सकाळी कुपवाडा जिल्ह्यातील पिचनाड माछिल परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्कर आणि कुपवाडा पोलीस शोधमोहीम राबवत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.