अयोध्या Ayodhya Ram Temple : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. पुढील वर्षी २४ जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुजाऱ्याच्या २० जागांसाठी ३००० अर्ज : राम मंदिरातील पुजारी पदासाठी मंदिर ट्रस्टनं अर्ज मागवले आहेत. माहितीनुसार, पुजारी पदाच्या २० जागांसाठी तब्बल ३००० अर्ज आले आहेत. ३००० पैकी २०० जणांची गुणवत्तेच्या आधारावर मुलाखत फेरीसाठी निवड केली जाईल, असं ट्रस्टच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. या २०० उमेदवारांना मुलाखतीला सामोरं जावं लागेल, जी कारसेवक पुरम या विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) अयोध्येतील मुख्यालयात होईल.
निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जाईल : अखेरीस, या २०० उमेदवारांपैकी एकूण २० उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची निवड करणाऱ्या तीन सदस्यीय कमिटीमध्ये वृंदावन येथील हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा यांच्यासह अयोध्येतील महंत सत्यनारायण दास आणि नंदिनी शरण यांचा समावेश आहे. निवडलेल्या उमेदवारांना पुरोहित म्हणून नियुक्त केलं जाईल. सहा महिन्यांच्या निवासी प्रशिक्षणानंतर त्यांची विविध पदांवर नियुक्ती होईल. ज्यांची निवड झाली नाही, मात्र ते प्रशिक्षणाला उपस्थित राहिले त्यांना प्रमाणपत्र मिळेल, असं ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितलं. या पुजाऱ्यांना भविष्यात निर्माण होणाऱ्या पुजारी पदासाठी बोलावलं जाऊ शकतं.
मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले जातील : मंदिरातील पुजाऱ्याचं प्रशिक्षण सर्वोच्च धर्मगुरूंनी तयार केलेल्या धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रशिक्षणादरम्यान, उमेदवारांना राहण्याची मोफत सोय आणि भोजन सुविधा मिळतील. याशिवाय त्यांना २००० रुपये स्टायपेंड देखील मिळेल. या मुलाखतीमध्ये, 'संध्या वंदन' म्हणजे काय? त्याची कार्यपद्धती काय आहे? या पूजेचे 'मंत्र' कोणते आहेत? प्रभू रामाच्या पूजेचे 'मंत्र' कोणते आहेत? यासाठी 'कर्मकांड' काय आहे? आदी प्रश्न विचारले जातील.
हेही वाचा :