दिल्ली - विमान वाहतूक मंत्रालयाने (Aviation Ministry) विमानतळांजवळ असलेल्या कोणत्याही विमानावर लेझर लाईटचा ( Laser light ) प्रकाशझोत मारणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक नियम कायद्यामध्ये काही बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार देशातील कोणत्याही विमानतळाजवळ एखादे विमान आलेले असल्यास त्यावर कोणालाही लेझर लाईटचा प्रकाशझोत मारता येणार नाही. कायद्याने त्यावर बंदी असणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते.
केंद्र सरकारला अधिकार - एखाद्या व्यक्तीला यासंदर्भात नोटीस देऊनही 24 तासात तो आपल्याजवळील लेझर लाईट बंद करीत नसेल तर बंद करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती कार्यावाही करू शकेल. यासाठी आवश्यकता पडल्यास त्या परिसरातील संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. नियमात बदल करण्याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे की, लेजर लाईटचा वापर करणाऱ्या व्यक्तीची ओळख न पटल्यास संबंधित विमानतळाचे प्रमुख कारवाई करण्यासंदर्भात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू शकतात.
कोलकत्यात वैमानिकांना झाला होता त्रास - विमान वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या सहा ऑगस्टला हा बदल प्रस्तावित आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दुर्गा पूजेच्या दरम्यान कोलकत्ता विमानतळाजवळ वैमानिकांना अशा स्वरुपाचा त्रास झाला होता. या भागातून वैमानिक विमान घेऊन जात असताना लेजर लाईटच्या प्रकाशाने त्यांचे चित्त विचलित झाले होते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी तेथील विमानतळ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विमान वाहतूक मंत्रालयाने नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल