श्रीनगर - त्राल येथील बसस्थानकात सीआरपीएफ आणि पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्याची घटना घडली. ग्रेनेड लक्ष्य साधू न शकल्याने मोठा घात टळला. या हल्ल्यात सात नागरिक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ग्रेनेड हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात एसएचओ त्राल मुनीर अहमद यांनी ईटीव्ही भारताला सांगितले. याच भागात 2 जून रोजी तीन अज्ञात दहशतवाद्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते राकेश पंडित यांना गोळ्या घालून ठार केले होते.
दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची गोळ्या झाडून केली हत्या
त्राल नगरपालिकेच्या समितीचे अध्यक्ष आणि पुलवामा जिल्हा भाजपा युनिटचे सचिव राकेश पंडित यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. ही घटना बुधवारी (२ जून) रोजी घडली. राकेश पंडित यांच्या राहत्या घराबाहेर त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुलवामा जिल्ह्यातील त्राल बसस्थानकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य करण्यात आल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे कट उधळून लावलेत. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी असाच हल्ला केला होता. यात 12 स्थानिक नागरिक जखमी झाले होते. तसेच 14 फेब्रुवारी, 2019 ला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. सीआरपीएफ जवानांच्या 78 गाड्यांचा ताफा जम्मूवरून श्रीनगरला जात होता. यावेळी पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला होता.