नवी दिल्ली: केंद्रिय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Union Minister of State for Finance Pankaj Chaudhary) यांनी राज्यसभेत (In the Rajya Sabha) लेखी उत्तरात सांगितले की, "विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून पैसे काढून फसवले. ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण 22 हजार 585.83 कोटी रुपयांचे नुकसान झाले, 15 मार्च पर्यंत, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002च्या तरतुदींनुसार 19 हजार 111.20 कोटींची मालमत्ताजप्त करण्यात आली आहे”
ते म्हणाले की, संलग्न मालमत्तांपैकी 15 हजार 113.91 कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण फसवणूक झालेल्या निधीपैकी 84.61 टक्के रक्कम जप्त करण्यात आली आहे आणि बँकांच्या एकूण नुकसानीपैकी 66.91 टक्के रक्कम बँकांना देण्यात आली आहे.
15 मार्च पर्यंत, एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाने लिलाव केलेल्या मालमत्तेच्या विक्रीद्वारे रु. 7 हजार 975.27 कोटी प्राप्त केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयामार्फत त्यांच्याकडे ही रक्कम सोपविण्यात आली आहे.