दिसपूर - आसाममधील नागाव येथील रहिवासी निहारिका दास यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला. निहारिका दास या महिलेने दोन किलोमीटर चालून आपल्या सासऱ्यांना स्वत:च्या पाठीवरुन रुग्णालयात नेले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलीची कर्तव्य पार पाडल्याने त्या एक आदर्श सून ठरल्या आहेत. सून असावी तर निहारिका दाससारखी अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
निहारिकाचे सासरे थुलेश्वर दास हे राहा क्षेत्रातील भटिगाव येथील सुपारी विक्रेत होते. 2 जून रोजी थुलेश्वर दासमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना 2 किमी दूर राहाच्या आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रिक्षाची व्यवस्था केली. पण ऑटो रिक्षा त्यांच्या घरी पोहोचू शकली नाही. त्यावेळी घरात कोणीही हजर नव्हते. सासरे फार कमकुवत झाल्याने ते चालू शकत नव्हते. तेव्हा निहारिका यांनी सासऱ्यांना पाठीवर घेऊन दोन किमीवर असणाऱ्या आरोग्य केंद्रावर चालत जाण्याचा निर्णय घेतला.
रस्त्यामध्ये अन्य एका रिक्षावाल्याच्या मदतीने निहारिका केंद्रावर पोहचल्या. रिक्षामधून उतरुन चालण्याची ताकदही थुलेश्वर यांच्यात नसल्याने निहारिकाने त्यांना पुन्हा पाठीवर घेत आरोग्य केंद्रात नेले. यावेळी अनेकांनी त्यांचे फोटो काढले. मात्र, मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
तथापि, इतकी मेहनत करूनही निहारिका आपल्या सासऱ्याचा जीव वाचवू शकल्या नाहीत. 5 जून रोजी थुलेश्वर यांचं निधन झालं. तसेच निहारिका यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. निहारिकाला एक 6 वर्षाचा मुलगा देखील आहे.