गुवाहाटी (आसाम): आसाम युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा अंकिता दत्ता यांनी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, आसाम पोलिसांनी श्रीनिवास यांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये श्रीनिवास यांना 2 मे रोजी सकाळी 11 वाजेपूर्वी दिसपूर पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पूर्व गुवाहाटीच्या अतिरिक्त पोलिस उपायुक्त मैत्रेयी डेका यांनी ही नोटीस बजावली आहे. अंकिता दत्ताने 19 एप्रिल रोजी दिसपूर पोलीस ठाण्यात बीव्ही श्रीनिवास यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. याच क्रमाने, एडीजीपी मैत्रेयी डेका यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी पोलिसांचे पाच सदस्यीय पथक शनिवारी कर्नाटकला रवाना झाले.
आसामचे मुख्यमंत्री काय म्हणाले: या संदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ट्विट करून म्हटले आहे की, 'आसाम पोलीस कायद्यानुसार काम करत आहेत. ते सध्या आरोपी व्यक्तीविरुद्ध आयपीपीच्या कलम 354 अंतर्गत महिला काँग्रेस कार्यकर्त्याने दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करत आहेत. महिला कार्यकर्त्यांसाठी काँग्रेस पक्षात सुरक्षित वातावरण नसल्याबद्दल मला दोष देणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले. आरोपींना कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य करण्याचा सल्ला द्या, बिसवा यांनी यावेळी दिला.
अटक होण्याची शक्यता: आसाममध्ये आल्यानंतर बीव्ही श्रीनिवास यांना चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीदरम्यान श्रीनिवासला अटक होण्याची शक्यता आहे. अंकिता दत्ताने श्रीनिवासवर छळ केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे, दिसपूर पोलिसांनी आधीच गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार अंकिता दत्ता हिने कामरूप महानगर जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात आयपीसीच्या विविध कलमांखाली श्रीनिवास यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारींदरम्यान तिचे म्हणणे नोंदवले आहे.
काँग्रेसनेही पाठवली आहे नोटीस: राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांच्यावर अंकिता दत्ताने केलेल्या आरोपानंतर काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, अंकिता दत्ताच्या तक्रारीनंतर राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या आयटी सेलने याआधीच अंकिताला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अंकिता दत्ताचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून शारदा घोटाळ्यातून सुटका करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी हे आरोप केले आहेत, असे राष्ट्रीय युवक काँग्रेसने कायदेशीर नोटीसद्वारे म्हटले आहे.