चेन्नई (तामिळनाडू) - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या पोशाखात सजवल्याने सध्या हे पोस्टर राज्यभरात विविध ठिकाणी भिंतीवर लावले आहे. यावर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तामिळनाडूमधील व्हीसीकेचे प्रमुख आणि खासदार थोल थिरुमालावलन यांनी या घटनेचा निषेध केला असून भारतीय राज्यघटनेच्या जनकाचा फोटो चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असून, हा फोटो त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे अशी प्रतिक्रिया थिरुमालावलन यांनी दिली आहे.
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'इंदू मक्कल काची' या पक्षाने राज्याच्या काही भागांमध्ये आंबेडकरांचे पोस्टर भिंतींवर लावले आहे. ज्यामध्ये आंबेडकरांच्या अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्म लावण्यात आला आहे. आंबेडकरांच्या या फोटोतून ते 'उजव्या विचारांचे' असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. या पोस्टरवर 'इंदू मक्कल काची'चे नेते अर्जुन संपत आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांचाही फोटो लावण्यात आला आहे. हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.