नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पक्षातर्फे रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल संबोधित करतील. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही येथे संबोधित करतील. या मेगा रॅलीबाबत बोलताना आम आदमी पार्टीने दिल्लीतील जनतेला यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या अर्ध्या तासात अपेक्षेइतकी गर्दी दिसली नव्हती.
सकाळी गर्दी दिसेना : या रॅलीला लोकांचा सहभाग मोठा असेल असे पक्षाला वाटले होते. परंतु सकाळच्या सत्रात लोकांची गर्दी नव्हती. दरम्यान, आप नेते म्हणतात की, लोक हळूहळू येत आहेत आणि मुख्यमंत्री येईपर्यंत संपूर्ण मैदान खचाखच भरले जाईल. सकाळी 10.22 वाजता दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल यांचे आगमन झाले होते. ते म्हणाले की, आज दिल्लीतील जनता केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात रामलीला मैदानावर एकत्र येत आहेत. दरम्यान दिल्लीतील ट्रान्सफर पोस्टिंगचा निर्णय दिल्ली सरकार घेईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी दिला होता. परंतु काही दिवसांनंतर केंद्र सरकारने नवीन अध्यादेश आणून तो निर्णय रद्द केला. याच्या निषेधार्थ मोठा मोर्चा काढण्यात येत आहे.
रामलीला मैदानात अर्धा डझन प्रवेशद्वार : रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीला येण्यासाठी अनेक प्रवेशद्वार करण्यात आले आहेत. दोन दरवाजे व्हीआयपी पाहुण्यांसाठी आहेत. गेट क्रमांक 2 मीडियासाठी आहे. उर्वरित 3, 4, 5 दरवाजे सर्वसामान्यांसाठी आहेत. दिल्ली पोलीस आणि आरएएफचे जवान येथे तैनात करण्यात आले आहेत. लोकांना तपासूनच रामलीला मैदानात पाठवले जात आहे. दरम्यान या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्ली सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ते आदी रामलीला मैदानावर आयोजित रॅलीला संबोधित करणार आहेत.
हेही वाचा -