चेन्नई : तामिळनाडूच्या एका भाजपा उमेदवाराने आपल्या प्रचारामधून मोदींचं नाव काढलं आहे. आपल्या मतदारसंघामध्ये मोदींच्या नावाने मतं मिळणार नाहीत, असा विश्वास असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. माजी आयपीएस अधिकारी कुप्पुसामी अन्नामलई असं या उमेदवाराचं नाव आहे.
अन्नामलई हे तामिळनाडूमधील अरावाकुरिची मतदारसंघातील उमेदवार आहेत. करुर जिल्ह्यातील पल्लाप्पट्टी, अरावाकुरिची, चिन्नाथापुरम आणि इसानाथम हे मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत. त्यामुळे याठिकाणी मोदींच्या नावाने मतं मागणे तितके फायदेशीर ठरणार नसल्याचे मत अन्नामलईंच्या कॅम्पेन टीमने व्यक्त केले होते.
आता जयललितांच्या नावाने मागणार मतं..
तामिळनाडूमध्ये भाजपा आणि अण्णाद्रमुकची युती आहे. त्यामुळे आता अन्नामलई हे जयललितांच्या नावे मतं मागणार आहेत. याद्वारे अधिक मतदार आकर्षित होतील, असे अन्नामलईच्या टीमचे म्हणणे आहे. यामुळेच अन्नामलईच्या नावापुढे 'मोदींचा आशीर्वाद' असं न लिहिता, 'अम्मांचा आशीर्वाद' (जयललिता) असं लिहिण्यात आलं आहे.
स्वतःच्या व्हिडिओचा करतात वापर..
जिथं भाजपाचे इतर उमेदवार मोदींच्या नावाने मत मागत आहेत. तसेच, भाजपा नेत्यांच्या भाषणांचा वा प्रचारसभांचा वापर करत आहेत. तिथं अन्नामलई मात्र स्वतःच्याच व्हिडिओंचा वापर करुन मत मागत आहेत. आपण आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा देत, ते आपल्या मतदारसंघामध्ये स्वतःचा प्रचार करताना दिसून येत आहेत.
हेही वाचा : खजिन्याच्या शोधात भुयार खोदताना गुदमरल्याने दोघांचा मृत्यू