जम्मू : जम्मू विमानतळावर एनएसजी कमांडोंनी अचानक एका विमानाला घेरले आणि ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विमानतळावर काही काळासाठी खळबळ उडाली होती. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या कमांडोनी विमानाला वेढा घातला होता. हे सर्व पाहून विमानाचे कर्मचारीही चक्रावून गेले होते. मात्र काही वेळाने उघडकीस आले की, हा कुठलाही दहशतवादी हल्ला नव्हता, तर विमानतळावर हायजॅक विरोधी मॉकड्रिल करण्यात आली होती.
वेळोवेळी मॉक ड्रिलचे आयोजन केले जाते : पोलीस आणि सुरक्षा दलांकडून वेळोवेळी अशाप्रकारच्या मॉक ड्रिलचे आयोजन केले जाते. या सोबतच सुरक्षा दलांना नवीन आव्हानांना तोंड देण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. कोणत्याही घटनेला सामोरे जाण्याची जवानांची क्षमता तपासण्यासाठी हे गरजेचे असते. या अनुषंगाने शुक्रवारी जम्मू विमानतळावर अँटी हायजॅक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याच्या पद्धतींचा सराव करण्यात आला.
एनएसजीकडून सरावाचे आयोजन : जम्मू विमानतळावर एनएसजीकडून अपहरणविरोधी सराव करण्यात आला. यामध्ये जम्मू एअरफोर्स स्टेशनवर अपहरण विरोधी समिती सक्रिय झाली होती. भारतीय हवाई दल, एएआय, राज्य सरकार, जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआयएसएफ, आयओसी आणि इतर प्रमुख एजन्सी या सरावात सहभागी झाल्या होत्या. सर्व सुरक्षा एजन्सींच्या प्रशिक्षणासाठी आयोजित करण्यात आलेला हा सराव यशस्वीरित्या पार पडला.
अपहरणाचा संपूर्ण क्रम हाताळला : संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांच्या म्हणण्यानुसार, या कवायतीमध्ये अपहरणकर्त्यांशी झालेल्या चर्चेसह घटनांचा संपूर्ण क्रम पद्धतशीरपणे हाताळण्यात आला. यानंतर एनएसजीच्या प्रशिक्षित टीमने हस्तक्षेप करून अपहरणकर्त्यांना पकडले. अशा संकटाच्या वेळी वेगवेगळ्या संस्थाच्या कार्यामध्ये समन्वय साधण्याची अनोखी संधी या सरावाने उपलब्ध करून दिली गेली आहे. प्रत्यक्ष कवायतीसाठी दुपारीच जम्मूत दाखल झालेले एअर इंडियाचे विमान वापरण्यात आले होते.