नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, हरीश रावत आणि के.सी वेणुगोपाल देखील उपस्थित होते. बैठकीनंतर सिद्धू यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.
शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. आम्ही इतरही पंजाबमधील नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे, असे पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी सांगितले. पंजाबच्या मंत्रिमंडळात किंवा राज्यातील काँग्रेसमध्ये काही बदल करण्यात येणार का, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. सध्या कोणत्याही मुद्द्यांपेक्षा शेतकरी आंदोलन अधिक महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
हरीश रावत यांनी यावेळी संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली. काँग्रेसचे नेहमीच भाजपशी वैचारिक मतभेद होते. आजही आहेत. भाजपाकडून शेतकरी व लोकशाहीला धोका आहे, असे ते म्हणाले. के.सी वेणुगोपाल यांनीही पंतप्रधानांवर हल्ला चढविला. पंतप्रधानांचे भाषण खूप निराशाजनक होते. बेरोजगारीलावर ते काहीच बोलले नाहीत, असे ते म्हणाले.