नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला केवळ ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. आता या सर्व विजयी आमदारांना केंद्राने सुरक्षा पुरवली आहे. या सर्वांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत केंद्राने हे पाऊल उचलले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
या सर्व आमदारांना सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांकडून सुरक्षा दिली जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी यासाठी परवानगी दिली. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि एका उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानंतर गृहमंत्रालयाने हे मान्य केले, की या आमदारांच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी मान्यता देण्यात आली.
या आमदारांपैकी ६१ आमदारांना 'एक्स' दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. तसेच, इतर आमदारांना 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, सुवेंदु अधिकारी यांना आधीपासूनच 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्यात आली असल्याचे गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
निकालानंतर बंगालमध्ये मोठा हिंसाचार..
बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असलेला पहायला मिळतो आहे. भाजपाने या सर्व हिंसाचारांच्या घटनांसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार ठरवले आहे. तसेच, बंगाल सरकार छुप्या पद्धतीने या सर्वाला पाठिंबा देत असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे. हिंसाचारा दरम्यान कित्येक भाजपा कार्यकर्त्यांची दुकाने लुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच, कित्येकांच्या घरातील महिलांनाही मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.
हेही वाचा : 'मोदी सरकारने महामारीकडे दुर्लक्ष केल्याने भारताला भयानक किंमत मोजावी लागतीयं'