प्रयागराज - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अखिल भारतीय अखाडा परिषदेने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या उपस्थितीत प्रयागराजमधील वाघंबरी मठामध्ये आखाडा परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सर्व तेरा आखाड्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी हा निर्णय करण्यात आला आहे. तसेच आखाडा परिषदेच्या या बैठकीत हरिद्वारच्या कुंभमेळ्यासह यूपीमधील मठ-मंदिरांच्या नोंदणीच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली.
सांधूच्या हत्यांवरून नाराजी-
आखाडा परिषदेच्या या बैठकीत महाराष्ट्रात वारंवार साधूच्या हत्या होत असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याच्या मागणीचा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला. आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार साधु-संतांच्या प्रतिनिधीचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर करेल.
निवडणुका घेण्याचीही करणार मागणी-
निवेदनामध्ये महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच सरकार बर्खास्त करून या ठिकाणी निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीचाही या निवेदनाता समावेश करण्यात येणार आहे. यावेळी आखाडा परिषदेच्या सर्वच साधूंनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. राज्यात पालघरमध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नांदेडमध्ये एका मठाधिपतीची हत्या आणि औरंगाबादमध्येही एका साधूवर गावकऱ्यांना हल्ला केल्याची घटना घडली होती.