नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवाल हे शांघाय सहकार संस्थेच्या (एससीओ) बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक दुशानबे येथे पुढील आठवड्यात होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांच्यासह एससीओच्या सभासद देशांचे सुरक्षा सल्लागार उपस्थित राहणार आहेत.
भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांची एससीओमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे का, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. यंदा एससीओच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे ताजीकिस्तानला आहे. एससीओमध्ये रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, कझाकिस्तान, क्रिझीस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार; नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
दोवाल यांनी अर्ध्यावरच सोडली होती बैठक-
गतवर्षी सप्टेंबरमध्ये एससीओच्या बैठकीत पाकिस्तानने भारताचा काल्पनिक नकाशा दाखवित बैठकीच्या आचारसंहिता भंग केली होती. त्यामुळे अजित दोवाल हे बैठकीमधून बाहेर पडले होते.
हेही वाचा-कोरोनाची तिसरी लाट दीड ते दोन महिन्यांत येणार- एम्सचा इशारा
भारत-पाकिस्तानमधील तणावाची स्थिती निवळली!
- गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या राजकीय आणि सैन्याच्या नेतृत्वाने भारताबद्दलची भूमिका सौम्य केल्याचे दिसून आले आहे.
- दक्षिण आणि केंद्रीय आशियाची क्षमता वापरण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये स्थिर संबंध असणे हा मुख्य मार्ग असल्याचे मत पाकिस्तानच्या सैन्यदलाचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी एप्रिलमध्ये व्यक्त केले होते. आपण भूतकाळ गाडून भविष्याकडे जाण्याची वेळ असल्याचे वाटत असल्याचेही बाजवा यांनी म्हटले होते.
- काश्मीर मुद्दा सोडवून द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली होती.
- फेब्रुवारीमध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्यक्ष सीमारेषेवर शस्त्रसंधीचे पालन करण्यावर सहमती असल्याचे जाहीर केले आहे.