जम्मू आणि काश्मीर : सोशल मीडियावर दहशतवादी धमक्या मिळाल्यानंतर काश्मीरमधील स्थानिक वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या पाच पत्रकारांनी राजीनामा दिला आहे.दहशतवाद्यांनी अलीकडेच डझनभर पत्रकारांची यादी जाहीर केली ज्यांच्यावर सुरक्षा एजन्सींसाठी काम केल्याचा आरोप आहे. यादीतील नावांमध्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या दोन संपादकांचा समावेश आहे. मंगळवारी राजीनामा दिलेल्या पाचपैकी तीन पत्रकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर राजीनामे प्रसिद्ध केले आहे. ( 5 local Journalists Resign In Kashmir )
संशयितांना ताब्यात घेण्यात आले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लश्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी गटाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या धमक्यांमागे आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी जाहीरपणे थेट धमक्या देऊन त्याने लोकांचे, विशेषत: प्रसारमाध्यमांचे जीवन धोक्यात आणले आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
तीन पत्रकारांनी सोशल मीडियावर केली पोस्ट : तीन पत्रकारांनी कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या सोशल मीडियावर राजीनामे प्रकाशित केले आहेत, कारण दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील तीन मीडिया हाऊससाठी काम करणाऱ्या कोणालाही ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. सिव्हिक बीटचे कव्हरेज करणाऱ्या एका तरुण रिपोर्टरचे म्हणणे आहे की त्याच्यावर लष्कराच्या विधानाचा अपप्रचार केल्याचा आरोप आहे. त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.