पणजी (गोवा) - माझ्या वडिलांनी प्रचंड मेहनतीतून संपूर्ण देशात गाजलेला तरुण तेजपाल यांचा खटला लढला. सहाशेपेक्षा जास्त पानांचा अंतिम युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर सादर केले होता. या खटल्याचा ऐतिहासिक निकाल ऐकायला आज ते आमच्यात नाहीत याच दुःख आहे. हा निकाल ऐकायला ते हवे होते. न्यायालयाच्या या निकालाचे मी स्वागत करतो, अशी भावाना या खटल्यातील तरुण तेजपाल यांचे वकील दिवंगत राजीव गोम्स यांचे पुत्र अॅड. शेन गोम्स यांनी व्यक्त केली. गोव्यातील नामवंत वकील राजीव गोम्स यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे.
अॅड. शेन गोम्स गहिवरले-
अॅड. शेन गोम्स यांना यावेळी गहिवरुन आले. अॅड. राजीव गोम्स यांनी संपूर्ण देशात गाजलेल्या या खटल्यात मोठी मेहनत घेतली होती. अॅड. सुहास वेळीप न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी हा निकाल आमच्यासाठी मोठा विजय आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, निवाडा देणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. क्षमा जोशी यांच्यासह प्रमोद दुबे, आमिर खान, अंकुर चावला, अमित देसाई, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, अमन लेखी, संदीप कपूर, रायन करंजेवाला आणि श्रीकांत शिवदे यांचेही सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच न्यायालयाच्या कठोर, निःपक्षपाती आणि न्यायिक खटल्याबद्दल आणि सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डवरील इतर अनुभवजन्य सामग्रीची सखोल तपासणी केल्याबद्दल गोवा पोलिसांचेही त्यांनी आभार मानले आहेत.