नवी दिल्ली : दिल्लीच्या जवळ असणाऱ्या गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयातमध्ये काही दिवसांपूर्वी आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजन संपल्यामुळे अतिदक्षता विभागातील या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप या रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच, यानंतर रुग्णालयातील डॉक्टर , नर्स आणि मेडिकल अटेंडंट फरार झाल्याचेही रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. या सर्व प्रकाराला सहा दिवस होऊनही अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
व्हिडिओ व्हायरल..
गुरुग्रामच्या कीर्ती रुग्णालयातील या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णांचे नातेवाईक शोक करताना दिसून येत आहेत. तसेच, जेव्हा हे नातेवाईक पोलिसांना डॉक्टरांना पकडण्याची विनंती करतात तेव्हा पोलिस असेही म्हणताना दिसून आले आहेत, की आम्ही काय डॉक्टरांना पकडून बसू का? जिल्हा प्रशासनानेही याप्रकरणी मौन बाळगले आहे. तर रुग्णालयाच्या मेडिकलमधील कर्मचारी मोहन याने त्या रात्री ऑक्सिजन संपल्याची गोष्टी खरी असल्याची कबूली दिली आहे.
रुग्णालयात रुग्णांची होते हेळसांड..
सिरसाहून आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले, की याठिकाणी रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते आहे. रुग्णालयात ना ऑक्सिजनची सोय आहे, ना येथील कर्मचारी चांगले आहेत. कित्येक लोक इथल्या रुग्णालय प्रशासनाला वैतागून आपल्या रुग्णांना डिस्चार्ज करुन दुसरीकडे नेत आहेत.
रुग्णालयावर कारवाई कधी?
या व्हायरल व्हिडिओमध्ये रुग्णालयावर भाजपाचा झेंडाही दिसून येत आहे. त्यामुळेच या रुग्णालयावर कारवाई केली जात नसल्याचा संशय सोशल मीडियातून व्यक्त केला जातो आहे. या निष्काळजीपणाला कोण जबाबदार आहे? असा प्रश्नही याठिकाणी उपस्थित होतो आहे.
हेही वाचा : इंदूरमध्ये कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे श्वानाला अटक!