गाझियाबाद : ACP Saved Life Of Girl : गुरुवारी रक्षाबंधानाच्या दिवशी गाझियाबादमधील निवासी भागात एक अल्पवयीन मुलगी इमारतीच्या छताच्या काठावर उभी राहिली. तिला आत्महत्या करायची होती. याची माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी तातडीनं पोलिसांना बोलावणं धाडलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला सुखरूप खाली उतरवलं. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुलगी कोणाचचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती : इंदिरापुरम भागातील अभय खांड पोलिस चौकीजवळील हे प्रकरण आहे. झालं असं की, येथील एका उंच इमारतीच्या छताच्या काठावर जाऊन एक मुलगी उभी राहिली. त्या मुलीला पाहून तेथे लोकांची गर्दी जमली. लोकांनी तिला खूप समजावलं, मात्र ती कोणाचचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. खूप समजावून सांगितल्यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली. मुलीनं असं का केलं याचं कारण आता समोर आलंय.
पोलिसांनी दिला आधार : मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. तर अलीकडेच तिच्या वडिलांनी तिला शिवीगाळ केली होती. यामुळे ती मुलगी तणावात होती. एसीपी स्वतंत्र सिंह यांनी सांगितलं की, जेव्हा ते मुलीची समजूत काढत होते, तेव्हा ती वारंवार तिच्या वडिलांच्या वागणुकीबद्दल बोलत होती. त्यानंतर त्यांनी मुलीला आधार दिला. 'आज रक्षाबंधन आहे. तु मला राखी बांध. मी तुला आधार देतो. तुला शिक्षणासाठी सपोर्ट पाहिजे असेल तर तो ही मी देतो', असं ते म्हणाले. त्यानंतर ती मुलगी शांत झाली आणि माघारी फिरली. मुलगी आता पूर्णपणे सुरक्षित आहे.
मुलीची सुटका करण्यात आली : या प्रकरणी एसीपी स्वतंत्र सिंह यांनी अधिक माहिती दिली. 'गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता एक मुलगी इंदिरापुरमधील हाऊसिंग सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ते मुलीशी बोलल्यानंतर तिची तेथून सुटका करण्यात आली. मुलगी खाली येताच बेशुद्ध झाली', असं एसीपी स्वतंत्र सिंह यांनी सांगितलं.
हेही वाचा :