तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केरळ डीजीपी आणि केरळ मोटर वाहन विभागाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोची येथे पंतप्रधानांच्या रोड शो संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
मूळचे त्रिशूरचे रहिवासी असलेले जयकृष्णन यांनी राज्याचे पोलिस प्रमुख अनिलकंठ आणि मोटार वाहन विभागाकडे ही तक्रार दाखल केली आहे. रोड शो दरम्यान पंतप्रधान त्यांच्या वाहनाच्या दाराला लटकून अभिवादन करत होते. तसेच फुले फेकून वाहतुकीत अडथळा आणणे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. वाहनाची काच पूर्णपणे झाकली गेली असल्याचे जयकृष्णन यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच, प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे आणि प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे असेही मत त्यांनी मांडले आहे.
जयकृष्णन यांनी काल दि. 26 रोजी तक्रार दाखल केली. 'युवम', तरुणांशी संवाद कार्यक्रम, वंदे भारत ट्रेन सेवेचे उद्घाटन, वॉटर मेट्रो, डिजिटल सायन्स पार्क इत्यादी विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान 24 एप्रिल रोजी कोची येथे आले होते. नरेंद्र मोदींचा रोड शो आधी आयोजित करण्यात आला होता. 'युवम' कार्यक्रम त्यानंतर झाला. रोड शो दरम्यान, त्यांनी आपल्या अधिकृत वाहनाच्या पुढील सीटला दरवाजापासून लटकून रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेल्या लोकांना अभिवादन केले. मोदींनी कोचीमध्ये 1.8 किमीचा रोड शो केला. केरळमध्ये पहिल्यांदाच मोदींनी एवढा मोठा रोड शो केला आहे. केरळच्या मूळ वेशभूषेत कोची येथे आलेल्या मोदींचे जनतेने जल्लोषात स्वागत केले. संपूर्ण रोड शोमध्ये लोकांनी पिवळी फुले टाकून आणि घोषणाबाजी करत पंतप्रधानांचे स्वागत केले. कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये मोदींना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय आला होता. दुसऱ्या दिवशी ते तिरुअनंतपुरममध्ये आल्यावर मोदींनीही असा रोड शो केला. तिरुअनंतपुरममध्ये मोदींचा रोड शो विमानतळ-शंखुमुगम मार्गावर झाला होता.