अहमदाबाद - गुजरात मधील तरुणीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये म्हटले की, जात प्रमाणपत्रात माझ्या जातीचा उल्लेख करु नये, अशी मागणी तिने आपल्या याचिकेत केली ( Gujrat Brahmin Girl Petition HC ) आहे. काजल मंजुळा असे या तरुणीचे नाव आहे. काजल राजगोर ब्राम्हण समाजातील आहे.
काजल म्हणाली की, जातीच्या ओळखीतून सुटका करुन घेण्याचे तिने ठरवले आहे. भविष्यात तिला तिच्या जातीचा अथवा धर्मचा उल्लेख कोठेही करायचा नाही आहे. याबाबत काजलचे वकील यांनी सांगितले की, आपल्या देशात समजातील भेदभावपूर्ण जाती व्यवस्थेमुळे अर्जदाराला आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्जदार हे राजगोर ब्राम्हण समाजातील असूनही, भेदभाव होत असल्याने त्यांना खूप त्रास होत आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या एका आदेशाच्या आधारे काजलने ही मागणी केली आहे. ज्यामध्ये स्नेहा प्रतिभाराज नावाच्या मुलीला जात अथवा धर्म नसलेले प्रमाणपत्र देण्याचे निर्देश मद्रास न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.
2017 साली काजलला जिल्हाधिकाऱ्यांनी धर्मांतर करण्यास परवानगी दिली नव्हती. कारण, कायद्यानुसार नागरिक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाऊ शकतो. मात्र, धर्मनिरपेक्ष अथवा नास्तिक म्हणून धर्मांतर करण्याबाबत कोणत्याही प्रकारची तरतूद कायद्यात नाही. त्यानंतर आता तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच काजलच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.